जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण येथे पहिले महिला पोस्ट ऑफीस सुरु.
कल्याण :- महिलांची कामगिरी ही भारतीय डाक सेवेत अतिशय चमकदार व धडाडीची राहिली आहे. त्यामुळेच महिलांना चांगल्या कामासाठी गौरविण्यात आलेले आहे. भारतीय डाक विभागाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे डाक विभागात सुभाष रोड पोस्ट ऑफीस, कल्याण येथे पहिले महिला पोस्ट ऑफीस सुरु केले.
या महिला डाक घरात चार महिला कर्मचारी असून त्यांच्या मार्पतच हे ऑफीस चालवले जाईल. या पोस्ट ऑफीसमध्ये विविध डाक सेवा जसे की सुकन्या समृद्धी योजना, सेविंग बँक, आवर्ती खाते, मासिक आय योजना, सिनिअर सिटीजन खाते व पोस्टाचा नवीन उपक्रम इंडिया पोस्ट पेमेंट बँक उपलब्ध आहेत. या महिला डाक घरात सर्व कामे या महिला कर्मचारीच करतील.
या महिला डाक घराचे शनिवार, 7 मार्च 2020 रोजी, ठाणे विभागाच्या प्रवर अधीक्षक डाकघर रेखा रिजवी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी महिला कर्मचाऱयांमार्पत धृवी शिंगरे या तीन महिन्याच्या कन्येने सुकन्या समृद्धी योजनेचे खातेही उघडण्यात आले व पासबुकाचे हस्तांतरण रेखा रिजवी यांनी केले. या उपक्रमाला शोभा मधाळे पोस्टमास्तर जनरल नवी मुंबई क्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले.
ठाणे विभागात अंदाजे 200 महिला वर्ग आहे. या विभागाच्या प्रवर अधीक्षक डाक घर तसेच पोस्टमास्तर जनरल नवी मुंबई क्षेत्र याही महिलाच आहेत.