ठाणे : -- भिवंडीतील एका गोदामामध्ये वापरलेल्या मास्कचा साठा आढळून आला होता. कारवाईच्या भीतीपोटी इमरान शेखने सर्व मास्क पूर्णागाव ग्रामपंचायत हद्दीत मुंबई पाईपलाईन लगत फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने सदर इसमाविरुध्द नरपोली पोलिसस्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड मधील इमारतीमध्ये वापरलेल्या मास्कचा साठा असल्याचे समाज माध्यमातून आढळून आले. या माहितीची तात्काळ दखल घेत जिल्हा प्रशासनाने तात्काळ पाहणी केली. पाहणी करण्यासाठी अधिकारी गेले असता तिथल कामगाराने मास्क पुर्णा ग्रामपंचायत हद्दीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन शेजारील कचरा टाकण्याच्या जागेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आढळून आले.
ठाणे जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य विभाग, तहसिलदार आणि पोलिस यंत्रणा यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करुन सर्व मास्कची जैववैद्यकीय पध्दतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला दिले होते . त्याप्रमाणे प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सदर मास्कची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरु केली आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग दक्ष आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.