ठाणे:- नरेंद्र कसबे.
ठाणे :- ठाणे महानगरपालिकेचे 22 वे महापौर म्हणून शिवसेनेचे श्री. नरेश गणपत म्हस्के यांची तर उपमहापौरपदी शिवसेनेच्याच सौ. पल्लवी पवन कदम यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या पदाचा पदभार स्विकारला. ठाण्याच्या विकासासाठी आपण कटिबध्द राहणार असून नागरिकांना असलेल्या सामाजिक समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. यावेळी आमदार श्री.प्रताप सरनाईक, श्री.रविंद्र फाटक,श्री. जितेंद्र आव्हाड, मावळत्या महापौर मिनाक्षी शिंदे, उपमहापौर श्री. रमाकांत मढवी सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका, महापालिका आयुक्त श्री. संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त 2 श्री. समीर उन्हाळे, उपायुक्त श्री.अशोक बुरपल्ले आदी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या भारतररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आज महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी मुंबई उपनगर श्री. मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. ठाणे महापालिकेचे 22 वे महापौर म्हणून श्री. नरेश म्हस्के व उपमहापौर म्हणून सौ. पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिका प्रशासनाच्यावतीने नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर यांचे स्वागत करुन त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.