लाभार्थ्यांना बीजभांडवल योजनेचे धनादेश वाटप.
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी समाजकल्याण विभाग राबवते योजना.
ठाणे -: ठाणे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्गत अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून बीजभांडवल योजना राबवण्यात येते. सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातील ९ अपंग व्यक्तींची या योजनेसाठी निवड करण्यात आली. या लाभार्थाना जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभापती संगीता गांगड यांच्या हस्ते सोमवारी ३० हजार रकमेचे धनादेश वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी रमेश अवचार यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून बिनभांडवल योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्हातील अपंग व्यक्तींना छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय करण्यासाठी हातभार लागणार आहे. यामध्ये 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेले लाभार्थी स्वतः उद्योग धंदा चालू करण्यासाठी रुपये 150000/- इतके कर्ज बँकेमार्फत देण्यात येते. त्यावर 20 % सबसिडी म्हणजे रुपये 30000/- विभागातर्फे देण्यात येतात.