ठाणे - : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मूल्यांवर भाजपचा पाया उभा आहे. सचोटी, निष्ठा आणि प्रामाणिकतेच्या जोरावर समाजासाठी कार्य करण्याची त्यांची तळमळ होती. दीनदयाळ उपाध्याय यांनी अनेक कार्यकर्ते घडविले. त्यांच्या तळमळीतूनच जनसंघ व कालांतराने भाजप उभा राहिला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व अभ्यासक रवींद्र महाजन यांनी येथे केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ५२ व्या स्मृतीदिनानिमित्ताने भाजपाच्या ठाण्यातील खोपट येथील कार्यालयात आज दीनदयाळजींना आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री. महाजन बोलत होते. या वेळी भाजपचे आमदार संजय केळकर, शहराध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर, नगरसेवक संदिप लेले आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देशभर पसरलेल्या भाजपाचे सिंचन करणारे नेते म्हणून दीनदयाळजींची ओळख आहे. त्यांनी कायम सचोटी, प्रामाणिकता व निष्ठेबरोबरच देशप्रेमाला महत्व दिले. त्यामुळेच उच्च विद्याविभूषित असूनही ते जनसंघाच्या कार्याकडे वळले, असे श्री. महाजन यांनी नमूद केले. दीनदयाळजींच्या प्रामाणिकपणाची काही उदाहरणे दिली. भाजीविक्रेत्या महिलेला दिलेले खोटे नाणे परत मिळण्यासाठीची धावपळ, गोळवलकर गुरुजींबरोबर चर्चा करताना चुकून केलेल्या प्रवासाचे भाडे टीसीला देण्यासाठीचा आटापिटा आदी उदाहरणे श्री. महाजन यांनी सांगितली.
आपल्या पक्षाचे एक धोरण असावे. त्याद्वारे नेते व कार्यकर्त्यांना मार्गक्रमण करता येईल, हे लक्षात घेऊन दीनदयाळ उपाध्याय यांनी जनसंघाचे धोरण तयार केले. पक्षासाठी निश्चित धोरणाचा त्यांचा आग्रह होता. त्याचबरोबर देशाचे नुकसान होता कामा नये, यावर त्यांचा कायम कटाक्ष होता. त्यामुळे त्यांनी परदेश दौऱ्यात कधीही कॉंग्रेस सरकारवर टीका केली नाही. मी परदेशात आहे, भारतातील सरकार माझे आहे, अशी त्यांची भूमिका होती, असे श्री. महाजन यांनी सांगितले.
दीनदयाळजींनी आखून दिलेली तत्वे व मूल्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून योजना राबविल्या जात आहेत, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. दीनदयाळजींचे कार्य डोळ्यासमोर ठेवून ठाणे भाजपातील प्रत्येक कार्यकर्ता मार्गक्रमण करेल, अशी ग्वाही शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिली. या वेळी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने समर्पण करुन दीनदयाळजींनी आखून दिलेल्या तत्वे व मुल्यांवर मार्गक्रमण करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
दीनदयाळ उपाध्यायांच्या मूल्यांवर भाजपचा पाया रवींद्र महाजन यांचे प्रतिपादन