ठाणे :- मराठी भाषा ही आपली मातृभाषा असून विविधतेने नटलेली अशी आहे. मात्र आपण आपल्या व्यवहारात मराठीचा वापर करतांना टाळाटाळ करतो आपल्या भाषेत एक गोडी आहे, त्यामुळे तिचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी डॉ. नारायण तांबे यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय ठाणे, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन ठाणे आणि अष्टविनायक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त काव्यानंद महोत्सव आणि मराठी जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन श्रीराम विद्यालय मंदिराचे पटांगण येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवी डॉ नारायण तांबे, जयंत भावे , प्रफुल्ल उज्जगरे, ठाणे वैभव संपादक मिलिंद बल्लाळ, नगरसेवक दिलीप बारटक्के, सुनिल सिनकर, जिल्हा माहिती आधिकारी मनीषा पिंगळे, संतोष कामेतकर, राजेंद्र झेंडे, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री मिलिंद बल्लाळ म्हणाले आपण मराठीचा आग्रह धरतांना इंग्रजीभाषेचा द्वेष करणे चुकीचे आहे. मराठी शाळांचा पट घसरत चालला आहे ही देखिल चिंतेची बाब आहे. या महाराष्ट्रात थोर कवी कुसुमाग्रज जन्माला आले हे आपले भाग्य आहे. मराठी ही आपली मायबोली आहे. त्यामुळे तिचे संवर्धन व जतन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनीही प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे असे म्हटले. आपल्या या मातृभाषेचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगत ती वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. कवी यांनीही यावेळी जयंत भावे , प्रफुल्ल उज्जगरे यांनी कविता सादर केल्या. संतोष कामेतकर, राजेंद्र झेंडे, संतोष सिनकर यांची समयोचित भाषणे झाली.