ठाणे येथुन ८ बोगस डॉक्टरांना पोलिसांनी केली अटक.
ठाणे :- ठाण्यातील कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र किंवा अधिकार नसतानाही मृत्यूचे प्रमाणपत्र देणाऱ्या तसेच रुग्णांच्या जीवाशी खेळून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या अलोक सिंह याच्यासह आठ तोतया डॉक्टरांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून स्टेथोस्कोपसह औषधे तसेच बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रेही हस्तगत केल्याची माहिती सूत्रंनी दिली.कळव्यामध्ये काही तोतया डॉक्टर असून ते लोकांच्या जीवाला धोका निर्माण करून ते त्यांच्यावर उपचार करतात, अशी माहिती कळव्यातील एका दक्ष नागरिकाने ठाणोगुन्हे अन्वेषण विभागाला २०१९ मध्ये अर्जाद्वारे दिली होती. याच अर्जाची मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने सखोल चौकशी केली. यामध्ये तथ्य आढळल्यानंतर महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, मुंबईचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, प्रबंधक दिलीप वांगे, सदस्य डॉ. बाळासाहेब हरपळे तसेच कर्मचारी रमेश पांचाळआणि मनोज बढे यांच्या मदतीने संबंधित बोगस डॉक्टरांच्या रुग्णालयांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. त्यानुसार, पोलीस उपायुक्त दीपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त एन.टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण, जमादार विजयकुमार राठोड, शरद तावडे, गोविंद सावंत आणि पोलीस हवालदार ईश्वर बुकाणो आदींच्या पथकाने ६ फेब्रुवारी रोजी कळवा विभागामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बनावट डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये धाड टाकली. या कारवाईमध्ये आलोक सिंह तसेच रामजित गौतम (४७), गोपाल बिश्वास (४०), रामतेज प्रसाद (५०), सुभाषचंद यादव (४७), जयप्रकाश विश्वकर्मा (४०), दीपक विश्वास (४८) आणि सत्यनारायण बिंद (४२) यांनी स्वत:च्या फायद्यासाठी गोरगरीब लोकांची फसवणूक केल्याचे आढळले. त्यांनी आपल्या रुग्णालयात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र, पदव्या प्रदर्शित करून अॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधांचा, इंजेक्शनचा आणि सलाईन उपकरणं आदींचा साठा मोठय़ा प्रमाणात ठेवून अँटीबायोटिक आणि तत्सम ड्रग्ज प्रत्यक्ष रुग्णांना देताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी कायदा कलम तसेच कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, मुंबई यांच्याकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून बोगस प्रमाणपत्रे तसेच औषधांचा साठाही जप्त करून त्यांना अटक केली आहे. आठही जणांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत.